साखर कारखान्याला पूर्ववैभवाकडे नेणार्यांच्या की बंद पडणाऱ्यांच्या पाठीशी राहणार डी के पवार
साखर कारखान्याला पूर्ववैभवाकडे नेणाऱ्यांच्या की कारखाना बंद पाडणारांच्या पाठीशी राहणार : डी. के. पवार
साखरवाडी गणेश पवार
बंद पडलेला साखरवाडी कारखाना पुन्हा चालू करुन साखरवाडी बाजारपेठेला पूर्व वैभवाप्रत आणण्याबरोबर शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गाला दिलासा देणाऱ्या श्रीमंत रामराजे यांच्या पाठीमागे रहायचे की ज्यांनी कारखाना बंद पाडून सर्वांचे नुकसान केले त्यांच्या पाठीमागे रहायचे याचा निर्णय ग्रामपंचायत पोट निवडणुकीतून होणार असल्याचे प्रतिपादन महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी केले आहे.
साखरवाडी ता. फलटण येथील वॉर्ड क्रमांक २ च्या पोटनिवडणूक प्रचार रणधुमाळीचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत राजे गटाचे उमेदवार राजेंद्र काशिनाथ भोसले यांच्या प्रचारार्थ राजे गटाकडून साखरवाडी गावामध्ये प्रचंड पदयात्रेद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महानंद दूध डेअरीचे व्हा. चेअरमन डी. के. पवार, पंचायत समिती माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उमाकांत भोसले, सागर कांबळे, संजय भोसले, आर. बी. भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र गायकवाड, गोरख भोसले, संतोष भोसले, महेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, विद्या भोसले, गौरीदेवी माडकर, सुनंदा पवार, कमलताई माडकर यांच्या सह वॉर्ड क्रमांक २ मधील मतदार बंधु भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेनंतर झालेल्या कोपरा सभेत डी. के. पवार बोलत होते.
डी. के. पवार म्हणाले, साखरवाडीला श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नातून गतवैभव प्राप्त झाले, अन्यथा साखरवाडीची भकासवाडी झाली असती, व्यापाऱ्यांना बाजारपेठ सोडून जाण्याची वेळ आली होती, हे नविसरता साखरवाडीच्या सर्वांगीण विकासाकरिता श्रीमंत रामराजे यांना सहकार्य करुन साखरवाडीची प्रगती साधण्याचे काम मतदारांनी करावे असे आवाहन डी. के. पवार यांनी केले.
साखरवाडी बाजार पेठ बहुतांशी पाटबंधारे व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागेवर वसलेली असल्याने या विभागा मार्फत कधी काळी धोका संभवतो त्यासाठी आपणास श्रीमंत रामराजे यांचीच मदत घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करुन आपण सरपंच असताना साखरवाडी साठी पाणी पुरवठा योजना, रस्ते व अन्य नागरी सुविधांची अनेक कामे केल्याची आठवण देत त्यापद्धतीने पुन्हा विकास पर्व राबविण्यासाठी ही ग्रामपंचायत श्रीमंत रामराजे यांचे नेतृत्व माननाऱ्यांकडे असणे गरजेचे असल्याचे डी के पवार यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून बंद पडलेला साखर कारखाना चालू झाला गावात मोठमोठे उद्योग धंदे येऊ लागले त्याच बरोबर को-जनरेशन, अर्कशाळा, साखर कारखान्याची विस्तार वाढ, साखर पोती उत्पादनाचा मोठा उद्योग येथे सुरु होतोय या उद्योग धंद्यात स्थानिकांना नोकऱ्या मिळणार तसेच गावाच्या व्यापार व्यवहारात वाढ होणार आहे, विशेषतः महिला वर्गाचा मोठा फायदा होऊन तरुणांना भविष्यात अधिक नोकऱ्या मिळण्याची संधी असताना ही संधी गमावू नये असे माजी सभापती शंकरराव माडकर यांनी निदर्शनास आणून दिले.
साखरवाडी एक औद्योगिक नगरी बनविण्याचे श्रीमंत रामराजे यांचे स्वप्न आहे त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणून श्रीमंत रामराजे यांच्या पाठीशी सर्वांनी राहू असे सांगून या निवडणुकीत राजेंद्र भोसले यांना निवडून देण्याचे आवाहन शंकरराव माडकर यांनी केले.
शंकरराव माडकर पुढे म्हणाले, साखरवाडीचा सर्वांगीण विकास भविष्यात जर करायचा असेल तर ग्रामपंचायत विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विचाराची असणे अत्यंत आवश्यक असून त्या अनुषंगाने उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत आपला उमेदवार विजयी होणे आवश्यक आहे.
यावेळी सुनील माने, राजेंद्र गायकवाड, आर. बी. भोसले वगैरेंची समयोचित भाषणे झाली.
होळ सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन सुधीर भोसले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राज्य गटाचे सर्व लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साखर कामगार, व्यापारी, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment